सोमण नरवणे...
Slide 1
Slide 1

❖ सोमण नरवणे कुलवृत्तांत ❖

सर्व सोमण नरवणे कुलबंधु व भगिनींना विनम्र अभिवादन

❖ आपल्या घराणेविषयी जाणून घ्या ❖

❖ वंशावळी आणि वृत्तांत ❖

सोमण-कुलांत ३६ घराणी आहेत. अधिक माहिती मिळाल्यास यातील काहीं घराणी एकत्र होण्याचा संभव आहे. सोमण कुलाचे कोंकणांतील मुळ ठिकाण एक नसून कोंकणांत अनेक गावी यांची वस्ती आहे. घराण्याला खुणेकरितां प्रायः मुळच्या गावाचे नाव दिले असून काहीं ठिकाणी सध्याच्या गावाचे नाव दिले आहे. प्रथम रत्नागिरी जिल्ह्यांतील घराणी देऊन पुढे इतर ठिकाणची घराणी दिली आहेत. घराण्याच्या मुळ गावाची माहिती काहीं ठिकाणी मिळाली ती आरंभी दिली असून त्यापुढे त्या घराण्यासंबंधी ऐतिहासिक पत्रे, सनदा दिल्या आहेत. त्यानंतर घराण्यांतील व्यक्तींच्या वास्वव्याचे गांव, कुलाचार, वतन, इनाम्, यांचा उल्लेख केल्यावर पिढ्यांचे आकडे घातले आहेत. जी छायाचित्रे आम्हांस मिळाली ती त्या त्या व्यक्तिच्या वृत्तान्ताचे समित दिली आहे. ज्येष्ठ बंधूंचा वृत्तान्त दिल्यावर त्याच्या पुत्र-पौत्रादिकांचा वृत्तान्त देऊन नंतर सर्वसाधारणपणे कनिष्ठ बंधूंचा वृत्तान्त दिला आहे.

❖ इतिहास ❖

सोमण-कुलाचें गोत्र शाण्डिल्य, वेद ऋग्वेद, शाखा शाकल आणि सूत्र आश्वलायन आहे. शाण्डिल्य गोत्राचे शाण्डिल्य-असित दैवल असे तीन प्रवर आहेत. या तीन ऋषींचे प्राचीन वाङ्‌मयांतील उल्लेख पुढे दिले आहेत. हे उल्लेख एकाच व्यक्तीला उद्देशून नाहींत. एकाच नांवाचे ऋषि भिन्न असण्याचा संभव आहे. शाण्डिल्य-यांचे नांव शाण्डिल असेंहि आहे. शाण्डिल्य ऋषि श्रौतकर्मात अत्यंत कुशल असल्याबद्दल शतपथ ब्राह्मणांत उल्लेख आहे. कौशिक, गौतम हे यांचे गुरू होत आणि कौण्डिन्य, आग्निवेश्य, वात्स्य हे यांचे शिष्य होत. मरीचिपुत्र कश्यप यांच्या वंशांत एक शाण्डिल्य ऋषि उत्पन्न झाले. शाण्डिल्य ऋर्षीच्या कुलांत वैश्वानर अग्नि उत्पन्न झाला म्हणून अग्नींचे गोत्र शाण्डिल्य होय. या व्यतिरिक्त अग्नीपासून शाण्डिल्य ऋषि उत्पन्न झाले व ते कश्यप ऋषींचे ज्येष्ठ बंधु होते असाहि महाभारतांत उल्लेख आढळतो. ब्रह्मसूत्रावरील भाष्यांत शाण्डिल्य विद्येचा उल्लेख येतो तो उपनिषदांतील वाक्याला उद्देशून आहे. भक्ती या विषयावर शाण्डिल्यभक्तीसूत्रं प्रसिद्ध आहेत. शाण्डिल्यस्मृति, शाण्डिल्यधर्मसूत्र, शाण्डिल्यतत्त्वदीपिका इत्यादि ग्रंथ शाण्डिल्यप्रणीत आहेत. असित-यांना असित देवल व असितोदेवल असेंहि नांव आहे. हे कश्यप ऋषींचे पुत्र. ऋग्वेदांतील मंत्रांचे द्रष्टे. अथर्व वेदांत यांचा गय आणि जमदग्नि यांच्यासह उल्लेख आहे. देवल-कश्यप कुलांतील एक ऋषि. हे असित यांचे पुत्र असल्याबद्दल उल्लेख आहे. यांचे नांवावर एक स्मृतिग्रंथ आहे. शाण्डिल्य हे कश्यप-गणांतील असल्यामुळे शाण्डिल्य गोत्र व काश्यप गोत्र यांचा विवाहसंबंध होत नाहीं. या दोन गोत्रांव्यतिरिक्त इतर कोणत्याहि गोत्राशीं यांचा विवाहसंबंध होतो. कोंकणस्थ ब्राह्मणांच्या एकंदर उपनावांपैकी निंम्याहून अधिक उपनांवें शाण्डिल्य व काश्यप या गोत्रांची आहेत. सोमण कुलाचें कोंकणांतील मूळ स्थान एकच असें निश्चित सांगता येत नाहीं. उपलब्ध झालेल्या माहितीवरून सोमण-कुलांत निरनिराळीं ३६ घराणीं होतात.